ad headr

Powered by Blogger.

अमळनेर बनले "सुरत"! गुरुकृपा व संताजी नगरसह अनेक कॉलन्या पाण्याखाली नगरपालिकेची नियोजन पूर्णपणे फ्लॉप...


      अमळनेर दि.३१ जुलै (प्रतिनिधी)
नगरपालिकेचा नाकर्तेपणा आणि अकार्यक्षमतेचा फटका आज पुन्हा एकदा अमळनेर शहरातील सामान्य नागरिकांना बसला आहे. पावसामुळे शहरातील ड्रेनेज व्यवस्था आणि नाले पूर्णपणे तुंबल्याने अनेक भागांना पुराचा वेढा पडला असून, परिस्थिती अक्षरशः 'सुरत शहरासारखी' भयानक झाली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या भागांत भीषण परिस्थिती:
शहरातील नवीन गुरुकृपा कॉलनी, श्री संताजी नगर, भालेराव नगर, श्री संत प्रसाद नगर आणि राजे छत्रपती संभाजी नगर या भागात पुराचे पाणी थेट लोकांच्या घरांमध्ये शिरले आहे. पाहता पाहता घरातील धान्य, कपडे आणि महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
कुठे सिलेंडर तर कुठे गाड्या वाहून गेल्या!
पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की अनेक भागांत रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्या पाण्यात वाहून जाताना दिसल्या. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून स्थानिक नागरिक भीतीच्या छायेखाली घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.
नगरपालिकेचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर:
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि सांडपाण्याच्या नियोजनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवणाऱ्या अमळनेर नगरपालिकेची पोलखोल पहिल्याच मोठ्या पावसाने केली आहे. "दरवर्षी कर भरूनही जर आमच्या घरात पाणी शिरत असेल आणि गाड्या वाहून जात असतील, तर याला पूर्णपणे नगरपालिका प्रशासनच जबाबदार आहे," असा थेट आरोप बाधित स्थानिक नागरिकांनी केला आहे.
तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी:
प्रशासकीय दिरंगाईमुळे झालेल्या या प्रचंड नुकसानीचे महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावेत आणि बाधित कुटुंबांना लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. नगरपालिकेने अजूनही ठोस पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.

No comments