भडगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष रेखाताई मालचे यांना मोठा दिलासा; जात पडताळणी समितीने विरोधकांची तक्रार फेटाळली.
भडगाव:- दि. 20 जुलै (प्रतिनिधी) सुभाष ठाकरे. नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. रेखा प्रदीप मालचे यांना जात पडताळणी समितीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राविरोधात राजकीय सूडबुद्धीने करण्यात आलेली तक्रार समितीने फेटाळून लावली असून, त्यांचे 'भिल्ल' जातीचे वैधता प्रमाणपत्र कायम ठेवले आहे.
सौ. रेखा मालचे यांना २०१४ मध्ये नंदुरबार जात पडताळणी समितीकडून 'भिल्ल' जातीचे वैध प्रमाणपत्र मिळाले होते. २०२५ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवरून त्यांनी निवडणूक लढवली आणि प्रतिस्पर्धी सुशीला शांताराम पाटील यांचा पराभव करत त्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. पराभवानंतर सुशीला पाटील यांनी रेखा मालचे यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात धुळे जात पडताळणी समितीकडे लेखी तक्रार केली होती. समितीने नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार दोन्ही बाजूंचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले. अखेर, तक्रारदाराचा अर्ज राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे स्पष्ट करत समितीने तो फेटाळून लावला आणि रेखा मालचे यांचे जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवले.
या कायदेशीर लढाईत नगराध्यक्ष रेखा मालचे यांच्या वतीने ॲड. बी. टी. अहिरे (भडगाव) यांनी प्रभावी बाजू मांडली, तर ॲड. समाधान सोनवणे यांनी त्यांना सहकार्य केले. जात पडताळणी समितीच्या या निर्णयामुळे भडगाव परिसरात सौ. रेखा मालचे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विरोधकांना हा मोठा कायदेशीर दणका मानला जात आहे.
------------प्रतिक्रीया-------------
"सत्याचा विजय झाला आहे. विरोधकांनी केवळ राजकीय आकसापोटी व जनतेने नाकारल्याचा राग काढण्यासाठी ही खोटी तक्रार केली होती. समितीच्या या निर्णयामुळे लोकशाहीचा आणि भडगावच्या जनतेचा विजय झाला आहे."
सौ. रेखा प्रदीप मालचे
(लोकनियुक्त नगराध्यक्ष, भडगाव)
Post a Comment