राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रिता भूपेंद्र बाविस्कर यांच्या वाहनावर हल्ला.
अमळनेर दि. 12 [ प्रतिनिधी ] वणी गावाजवळ पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय राज्य नियोजन समितीच्या सदस्या रिता भुपेंद्र बाविस्कर यांच्या वाहनावर कथित गोरक्षकांनी हल्ला केल्याचा आरोप समोर आला आहे. गाडीचा पाठलाग करून समोर लोखंडी खिळ्यांचा रॉड टाकत टायर पंक्चर करण्यात आले, त्यानंतर वाहनाची तोडफोड करत गोंधळ घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी पहाटे सुमारे ३ वाजेच्या दरम्यान रिता बाविस्कर या आपल्या भावासह चारचाकी वाहनाने अमळनेरहून मुंबईकडे निघाल्या होत्या. प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावरून एका चारचाकी वाहनासह मोटरसायकलवरील काही जणांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. सुरुवातीला हा प्रकार सामान्य असल्याचे वाटले, मात्र मंगरूळ परिसरानंतर संशय अधिक गडद झाला.वणी गावाजवळ पोहोचताच हल्लेखोरांनी अचानक त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक केले.
त्यानंतर गाडीच्या पुढील आणि मागील चाकांसमोर लोखंडी खिळ्यांनी भरलेला रॉड टाकण्यात आला. अचानक टायर पंक्चर झाल्याने वाहन थांबवावे लागले. गाडी थांबताच काही जणांनी वाहनाभोवती गर्दी करत जोरदार आरडाओरडा सुरू केला. वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकारामुळे बाविस्कर आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी आपल्या मुलीलाही फोन करून घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली. या वेळी हल्लेखोर आणि बाविस्कर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचेही समजते.विशेष म्हणजे, हल्लेखोरांनी स्वतःला “गोरक्षक” असल्याचे सांगत गाडीत गाय असल्याचा संशय आल्याचा दावा केला. मात्र कोणतीही खात्री न करता मध्यरात्री महिलांच्या वाहनाचा पाठलाग करून अशा प्रकारे हल्ला करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच धनंजय पाटील यांनी तातडीने पोलिस पथक घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी जलद हालचाली करत अवघ्या काही वेळात तिघा संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मिलिंद पाटील (वरखेडी), सौरभ जाधव (दंडेवाला बाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे) आणि प्रमोद देविदास सोनवणे (बाळापूर) यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११०, ३२४(४) आणि ३२४(६) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रशांत राठोड करत आहेत.दरम्यान, या घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. अनिल पाटील तसेच स्मिता वाघ यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे बोलले जात आहे. पहाटेच्या वेळी एका महिला नेत्या आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या या कथित हल्ल्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Post a Comment