जळगावात रंगणार युवा खेळाडूंचा ‘बास्केटबॉल महासंग्राम’! युवासेनेतर्फे सलग सहाव्या वर्षी स्पर्धेचे आयोजन; चार जिल्ह्यांतील १२ संघांचे १६८ खेळाडू मैदानात उतरणार
जळगाव, ( प्रतिनिधी ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेतर्फे उत्तर महाराष्ट्रातील उदयोन्मुख बास्केटबॉल खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्तर महाराष्ट्रस्तरीय कुमार गट बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे ही स्पर्धा सलग सहाव्या वर्षी रंगणार असून, यामुळे क्रीडाप्रेमींना बास्केटबॉलचा रोमांचक थरार अनुभवता येणार आहे.
या स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चार जिल्ह्यांतील एकूण १२ संघ सहभागी होणार असून, तब्बल १६८ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. मैदानावरील चुरशीच्या लढती, खेळाडूंची चपळता आणि विजयासाठीची जिद्द यामुळे स्पर्धेत रंगत निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
स्पर्धेचे तांत्रिक नियोजन जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव जितेंद्र शिंदे व त्यांचे सहकारी करणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून नियोजन करण्यात येत आहे.
क्रीडाप्रेमींना उपस्थितीचे आवाहन
जळगाव शहरातील अधिकाधिक क्रीडाप्रेमी नागरिकांनी या स्पर्धेला उपस्थित राहून सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी आणि महानगर युवाधिकारी प्रितम शिंदे यांनी केले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून, उत्तर महाराष्ट्रातील बास्केटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे.
Post a Comment