🔴 भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांचा 'तो' वादग्रस्त आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द; खंडपीठाचा मोठा निर्णय.
भडगाव दि .25 ( प्रतिनिधी ) सुभाष ठाकरे.
येथील तहसीलदार शीतल सोलाट यांनी मौजे टोणगाव शिवारातील ७/१२ उताऱ्याबाबत दिलेला वादग्रस्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अखेर रद्द केला आहे. कायदेशीर वारसाचे नाव बेकायदेशीरपणे कमी केल्याप्रकरणी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, यामुळे संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मौजे टोणगाव शिवारातील गट नं. ५६१/१ च्या ७/१२ उताऱ्यावर कायदेशीर वारस म्हणून नबाबाबाई शामा पाटील यांचे नाव नोंदवलेले होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम १५५ अन्वये ७/१२ उताऱ्यावरील केवळ लिपिकीय (टायपिंग) चुका दुरुस्त करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. मात्र, या अधिकाराचा गैरवापर करत तहसीलदार शीतल सोलाट यांनी कादिरखान नावाच्या व्यक्तीशी हातमिळवणी केली आणि लिपिकीय चूक दुरुस्त करण्याच्या नावाखाली नबाबाबाई यांचे नाव ७/१२ उताऱ्यावरून थेट काढून टाकले.
न्यायालयात आव्हान आणि सुनावणी:
तहसीलदारांच्या या अन्यायी आणि वादग्रस्त आदेशाविरोधात नबाबाबाई यांच्या सून ताराबाई यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान तहसीलदार भडगाव यांच्या वतीने खंडपीठात एक प्रतिज्ञापत्र (शपथपत्र) दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये 'वारस कमी करण्याचे कोणतेही आदेश दिलेच नव्हते' असा खोटा बचाव करण्याचा प्रयत्न महसूल विभागाकडून करण्यात आला. मात्र, न्यायालयाने हा लेखी युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला आणि तहसीलदार शीतल सोलाट यांचा तो वादग्रस्त आदेश रद्द बातल ठरवला.
निलंबन आणि गुन्हा नोंदवण्याची मागणी
या गंभीर प्रकरणा नंतर शिवसेना शहर प्रमुख नंदकिशोर पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी मागणी करत, तहसीलदार शितल सोलाट यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करून त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी खंडपीठासमोर खोटे शपथ पत्र सादर केल्या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२९ अन्वेय संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ही पाटील यांनी केली.
या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने अँड. भूषण महाजन (गुढे) यांनी न्यायालयात बाजू मांडली.
Post a Comment