ad headr

Powered by Blogger.

संस्कृती माध्यमिक विद्यालयात 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात दिंडी सोहळा उत्साहात संपन्न! विठ्ठल-रुक्मिणीच्या गजराने परिसर भक्तिमय; चिमुकल्या वारकऱ्यांनी वेधले लक्ष.


    जळगाव:. ( प्रतिनिधी )  आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून संस्कृती माध्यमिक विद्यालयात पारंपरिक ‘दिंडी सोहळा’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. टाळ-मृदंगाचा गजर, ‘ज्ञानोबा-माऊली तुकाराम’चा जयघोष आणि वारकरी वेशभूषेत नटलेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर विठ्ठलमय करून सोडला होता.
या नयनरम्य दिंडी सोहळ्याचा शुभारंभ   जयदुर्गा महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ. जयश्रीताई सुनील महाजन  यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन आणि भावपूर्ण आरती करून करण्यात आला.
त्यानंतर शालेय परिसरातून श्री विठ्ठलाच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पोशाखात, डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी आणि हातात टाळ-मृदंग घेऊन ठेका धरणारे विद्यार्थी या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले. टाळ-मृदंगाच्या तालावर रंगलेल्या फुगड्या आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
विद्यार्थ्यांमध्ये आपल्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख व्हावी, भक्तीभाव आणि सांस्कृतिक मूल्यांचे संस्कार रुजावेत, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांची मोठी उपस्थिती लाभली. विठूरायाच्या जयघोषात आणि अभंगांच्या सुरांमध्ये कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मुख्याध्यापिका सौ डी. सी येवले  तसेच
 सौ जे .पी सपकाळे,
 श्रीमती ए वाय फालक,
श्री एस व्ही कोल्हे,
 श्री आय वाय पाटील,
 सौ कामिनी महेश महाजन,
 श्रीमती  बिजलपुरे, 
श्रीमती मनीषा जाधव,
 श्री विवेकानंद तायडे,
 सुवर्णा शेवरे मॅडम,
आदींनी परिश्रम घेतले

No comments