ad headr

Powered by Blogger.

धरणगाव हादरले! नराधम शिक्षकाकडून ४ थीतील चिमुरडीवर दोन वर्षे अत्याचार; गुन्हा दाखल

धरणगाव [ प्रतिनिधी ]. तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी आणि शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम शिक्षकाने इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या १० वर्षांच्या चिमुरडीवर मागील दोन वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पोक्सो) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा रोज सकाळी शाळा भरण्यापूर्वी १० वाजता तिला झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत एकटीला बोलावून घेत असे. शाळा रिकामी असल्याचा गैरफायदा घेऊन तो तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करायचा. इतकेच नव्हे, तर तो पीडितेला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण करत असे. या प्रकाराला विरोध केल्यास तो तिला बेदम मारहाण करायचा आणि कोणाला सांगितल्यास “तुझे आई-वडील मरून जातील,” अशी भीतीदायक धमकी देऊन तिला गप्प बसवायचा.
​३० एप्रिल २०२६ रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशीही या नराधम शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला होता. शाळा सुटल्यानंतर सुट्ट्यांमध्ये मुलगी जेव्हा आपल्या मावशीकडे गेली, तेव्हा तिथे तिची तब्येत खालावली आणि तिने जेवण करणे बंद केले. नातेवाईकांनी तिला प्रेमाने विश्वासात घेतले असता, तिने रडत रडत आपल्यासोबत घडलेला हा सर्व भयानक प्रकार उघड केला.

​या क्रूर घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या आईने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तत्परतेने आरोपी शिक्षक नंदलाल मराठे विरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा विकृत नराधम शिक्षकाला कठोरतम शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

No comments